दहावी बारावीचा अर्ज भरायचाय मग जास्त शुल्क द्या

पुणे : गेली कित्येक वर्ष बाहेरुन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने होणारी आर्थिक तसेच शैक्षणिक फसवणूक पहाता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचा पर्याय यंदापासून उपलब्ध करुन दिला. मात्र तो पर्यायही अधर्वट दिल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.राज्यभरात दरवर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी हे बाहेरुन म्हणजेच 17 नंबरचा अर्ज भरत परीक्षेला बसतात. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्याही साधारण एवढीच असते. या विद्यार्थ्यांना बाहेरुन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने काही केंद्रे निश्‍चित केली आहेत त्या केंद्रावर जाऊन यापूर्वी विद्यार्थी अर्ज भरत होते. मात्र त्यांना शुल्क किती याची कल्पना नसल्याने अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून या केंद्र ठरविण्यात आलेल्या शाळा अव्वाच्या सव्वा शुल्क घेत होत्या. एका शाळेने तर विद्यार्थ्यांकडून पैसे तर घेतले मात्र अर्जच भरले नसल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर अर्ज पध्दती ऑनलाईन करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. ही मागणी मान्य करत राज्य मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र यामध्ये पैसे मात्र शाळांमध्येच जाऊन भरण्याचा पर्याय ठेवला. ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्यायाची एकीकडे सरकार जाहिरात करत असताना राज्य मंडळ मात्र अद्यापही रोख स्वरुपात अर्ज स्विकरताना दिसत आहे.