‘एमआयएमलाही आघाडीत घेतले, तरच आम्हीही आघाडीत जाऊ’, प्रकाश आंबेडकर

 मुंबई : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ युती करून राज्यातील निवडणूका लढण्याचा डाव आहे. त्याचप्रमाणे भाजप ला धुळीत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी , काँग्रेस आणि इतर पक्ष आपापसात  भाजप विरुद्ध आघाडी करत आहेत.

.सर्व विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी मित्र पक्षांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला आघाडीत घेण्यासाठी विरोधक तयार असताना, असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाला सोबत घेण्यास आघाडीचे नेते तयार नसल्याचे दिसून येते आहे.
त्या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाला  सहभागी व्हायचे असेल तर एमआयएम पक्षाला काडीमोड द्यावी लागेल असे राष्ट्रवादी कडून प्रकाश आंबेडकरांना सांगण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवसी यांचा एमआयएम या पक्षांनी एकत्र येत, वंचित बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने भारिप बहुजन महासंघासोबत एमआयएमलाही आघाडीत घेतले, तरच आम्हीही आघाडीत जाऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. मात्र, आघाडीचे नेते एमआयएमला सोबत घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत नाही.