‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’

yashomati thakur and balasaheb thorat

मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरती कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.

संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्या व महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील भाष्य केलं आहे.

‘विधानसभा निवडणुकीत 12 ते 13 जागा काँग्रेसच्या निवडून येतील, असं बरंच जण बोलत होते. कोणी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश आणलं. आधी ते म्हणाले 16 जागा येतील आणि 44 जागा निवडून आल्या. 44 जागा बोलले असते तर 80 जागा आल्या असत्या,’ असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

यासोबतच, ‘बाळासाहेब थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलंच पाहिजे, पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही.’ असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली.’ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत. काँग्रेस हायकमांडने अद्याप महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र पटोले यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या