‘कुंभकोणींबद्दल शंका होती तर इतके दिवस कुंभकर्णाच्या झोपेत होते काय?, भाजपचा काँग्रेसवर पलटवार

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून सर्वाच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील मुद्दे योग्य पद्धतीने मांडण्यात येत नाहीत. त्यामुळेच राज्य सरकार खटले हरत आहे. राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांना बदलण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित करत महाविकास आघाडी सरकारवर कडाडून मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारला बोलण्याचे भान राहिलेलं नाही. पदाची गरीमा काय? भाष्य करताना आपलं कर्तव्य काय? कुंभकोणीजी यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका होती तर गेली दिड वर्ष तुम्ही कुंभकर्णाची झोप काढत होता काय? असा सवाल त्यांनी त्यांनी विचारला.

तसेच ‘मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरुन पैसे द्यायचे नाहीत. राज्याच्या महाधिवक्त्यावर शंकास्पद भाष्य करताना अशा पद्धतीने बोलणं म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे. राज्य चालवता येईना म्हणून कुंभकोणी वाकडे, ही जी भावना आहे ही अतिशय नादानीची भाषा आहे. तुम्हाला राज्यकर्ते म्हणून वकिल नियुक्त करण्याचा अधिकार आहे. शंभर वकिलांची फौज तिथे नियुक्त करता येईल. पण तुम्हाला राज्य चालवायचच नाही. याला अटक करा त्याला अटक करा यातच तुमचा वेळ जात आहे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

नाना पटोले काय म्हणाले होते?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले होते की, २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एका परिपत्रकावरून नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द केल्या होत्या. तेव्हाही कुंभकोणीच राज्याचे महाधिवक्ता होते. आजदेखील कुंभकोणीच राज्याचे महाधिवक्ता असताना सरकारच्या विरोधात कोर्टाचे निर्णय का येत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :