आधारकार्ड नसल्यास पुढील वर्षी शालेय साहित्य नाही !

पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शालेय साहित्याचे अनुदान पुढील शैक्षणिक वर्षापासून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, आधारकार्डसाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे आधारकार्ड नसेल तर पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागणार आहे.शिक्षण हक्क कायद्यामुळे महापालिकेचे शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले. त्यामुळे मंडळाचा कारभार महापालिकेकडे आलेला आहे. त्यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना साहित्य देण्यासाठी पालिका प्रशासनाने डीबीटी योजना राबविली.

मात्र, त्यात विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा न करता या विद्यार्थ्यांना विद्याधन नावाचे डीबीटी कार्ड देण्यात आले. त्यानुसार, या कार्डावरून मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश देण्यासाठी शहरातील 43 विक्रेत्यांची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे मुलांना शाळेत साहित्य दिल्यानंतर त्यांचे कार्ड पॉस मशिनवर स्वॅप करून त्याचे पैसे दुकानदारांना दिले जातात.

या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. मात्र, त्यातही अनेक अडथळे येत असल्याने आता प्रशासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँकेशी जोडणे आवश्यक असल्याने या मुलांना आधार सक्ती केली जाणार आहे.