पुरावे असतील तर खुशाल तक्रार करा; अजित पवारांचं दरेकरांना सडेतोड उत्तर

पुरावे असतील तर खुशाल तक्रार करा; अजित पवारांचं दरेकरांना सडेतोड उत्तर

मुंबई : मुंबै बँकेची चौकशी लावल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संतापून ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. ‘जर पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी. सरकारच्या आदेशाने चौकशी यंत्रणा चौकशी करतील. त्यातून पुढे जे निष्पन्न व्हायचं ते होईल’, असं म्हणत अजित पवारांनी प्रविण दरेकरांच्या आव्हानाला सामोरं जाणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे जिल्हा बँकेत महाभ्रष्टाचार आहे. त्याची तक्रार ईडी, सीबीआय आणि केेंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्य प्रविण दरेकरांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच राज्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांच्या देखील तक्रारी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं दरेकर म्हणाले. दरेकरांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिली आहेत.

प्रत्येक संस्थेबद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या वेगवेगळ्या विभागामार्फत चौकशी करु शकते. कुणाला काही वाटत असेल, काही माहिती असेल तर तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी. तक्रारीची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य असेल तर संबंधितांवर अ‌ॅक्शन घेण्यात येईल, जर तथ्य नसेल तर तक्रारीत तथ्य नाही, असं सांगण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.

किरीट सोमय्या कारखान्यांचा विषय काढतात, वेगवेगळे आरोप करतायत. तर प्रविण दरेकर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या भ्रष्टाचारावर बोलतात. भाजपला काय इशारे द्यायचेत?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. ‘हे नेमकं काय चाललंय, राजकारण आहे की नाही हे मीडियाने ठरवायचं. काहींची सत्ता येत असते, काहींची जात असते. पण सध्या राजकारणाला उगीच उत आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्याचा त्याचा राजकारणाचा तो भाग असतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या