‘प्रभूरामाच्या नावे घोटाळा होत असेल तर…’ ; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी

sanaj raut on ram mandir

मुंबई : अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. संजय सिंह यांच्या या आरोपांनंतर आता देशातील राजकारण तापू लागले आहे.

आता शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रस्टची स्थापना करताना सगळ्या भाजपच्या सदस्यांना घेण्यात आलं आहे. आमच्या पक्षाचा एकही सदस्य नाही. यामुळे जर घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करावी आणि ट्रस्टकडून खुलासा करण्यात यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराच्या निर्माणासाठी जगभरातून निधी आला. हा निधी लोकांनी श्रद्धेपोटी दिली आहे. अनेक ठिकाणाहून देणग्या गोळा केल्या गेल्या. राम मंदिर हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे घोटाळ्याचा विषय नाही. त्यामुळे जर निधीचा गैरवापर होत असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी खुलासा करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली आहे. ट्रस्टने समोर येऊन आरोपांचा खुलासा करावा इतकंच नाहीतर यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजपच्या नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे, असंही यावेळी राऊत म्हणाले.

कॉंग्रेसच्या नेत्या व काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे. कोरोडो लोकांच्या श्रद्धेचा अपमान ट्रस्टने केला असल्याचे म्हटले आहे. प्रियांका गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, कोट्यावधी लोकांनी विश्वास आणि भक्तीमुळे देवाच्या चरणी देणगी अर्पण केली आहे. त्या देणगीचा गैरवापर करणे म्हणजे अधर्म आणि पाप तसेच त्यांच्या विश्वासाचा अपमान आहे. अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP