वेळ आलीच तर अदर पुनावालांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल : नाना पटोले

nana patole

मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. सदर वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.

हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’, असं पूनावाला यांनी म्हंटल आहे. यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. असं देखील आदर पूनावाला पुढे म्हणाले होते.

परंतु आता अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतात अदर पूनावाला नसताना आणि राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज त्यांनी केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसे काय देऊ शकते? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. यामागे काय लपले आहे हे वास्तव समोर आले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही पटोले म्हणाले आहेत.

अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजून सुरक्षा हवी असेल तर दिली जाईल. काँग्रेसही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण त्यांनी धमकावणारे हे नेते कोण आहेत, हे अदर पूनावाला यांनी जाहीर करावे, असेही ते म्हणाले. राज्याच्या जनतेसोबत देशातील जनतेचे लसीकरण होणे ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे यावेळी पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोणी धमक्‍या दिल्यास त्यांनी पोलिस विभागाकडे तक्रार करावी. राज्य पोलिस निश्‍चितच गांभीर्यांने या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कारवाई करतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या