‘झोपलेली जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते’, अण्णा हजारेंचे वक्तव्य

अहमदनगर : लोकायुक्तच्या मुद्द्यावर राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशपातळीवर संघटना बांधणीचे काम सुरू केलं आहे. देशातील १४ राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये झाले.

गेल्या आठवड्यात अण्णा हजारे यांनी राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अन्यथा जानेवारीपासून आंदोलनचा इशारा देताना एक तर कायदा होईल, किंवा राज्यातील ठाकरे सरकार पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडी सुरू असतानाच राळेगणसिद्धीमध्ये राष्ट्रीय कार्यकर्ता शिबीर झाले. यामध्ये हजारे यांनी देशव्यापी मुद्द्यांना हात घातला.

‘भाजप, काँग्रेस वा इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सर्वच राजकीय पक्ष व नेते सत्ता, सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता याच्या मागे लागले आहेत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी जनतेचे मजबूत संघटन गरजेचे आहे. मजबूत जनसंसदेशिवाय देश वाचणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. झोपलेली जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते, असेही ते म्हणाले.

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा, २०१८ आणि १९ मध्ये आंदोलने केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा, अशी आपली आग्रही भूमिका आहे. शेतकरी आंदोलन आणि इतर बाबतीत माझ्यावर टीका होते, मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. समाज आणि देशहितासाठी शक्य ते प्रामाणिकपणे करणे हे माझे काम आहे आणि ते मी गेली ४६ वर्षे मंदिरात राहून करीत आहे’ असे अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या