‘संघाने खुशाल नथुरामचे मंदिर बांधावे’- तुषार गांधी

tushar-gandhi

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा नथुरामचा कळवळा असणारे समाजातील इतर घटक असोत त्यांनी खुशाल नथुरामचे मंदिर बांधावे. आपण त्याच मुळीच विरोध करणार नाही. मात्र मी हयात असेपर्यंत महात्मा गांधींचे मंदिर निर्माण होऊ देणार नाही असं वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. नथुरामचे मंदिर बांधल्यामुळे खून करणाऱ्यावर कोण कोण प्रेम करत आले आहे हे जगासमोर उघड होईल. त्यामुळे राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर अश्रू ढाळणारे नथुरामच्या मंदिरात जातानाही अनेकांना बघायला मिळतील अशीही टीका तुषार गांधी यांनी उस्मानाबादमध्ये केली.

नानासाहेब पाटील अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रम समितीच्या वतीने उस्मानाबाद नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुलात ‘महात्मा गांधी आणि आजचा भारत’ या विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान झाले. याच व्याख्यानात तुषार गांधी यांनी आपली भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले तुषार गांधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा नथुरामचा कळवळा असणारे समाजातील इतर घटक असोत त्यांनी खुशाल नथुरामचे मंदिर बांधावे. आपण त्याच मुळीच विरोध करणार नाही. मात्र मी हयात असेपर्यंत महात्मा गांधींचे मंदिर निर्माण होऊ देणार नाही.नथुरामचे मंदिर बांधल्यामुळे खून करणाऱ्यावर कोण कोण प्रेम करत आले आहे हे जगासमोर उघड होईल. त्यामुळे राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर अश्रू ढाळणारे नथुरामच्या मंदिरात जातानाही अनेकांना बघायला मिळतील.मागील सत्तर वर्षात गांधींचा द्वेष करणाऱ्या विशिष्ट समूहाकडून असत्य प्रचाराचा डंका पिटविला जातो आहे. त्यांच्याकडून गांधीहत्येमागे असलेली जी तथाकथित कारणे सांगितली जातात त्यात अजिबात तथ्य नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत नथुराम गोडसेविषयी कळवळा बाळगणारेच सातत्याने शंका कुशंका निर्माण करत आहेत. असत्याची पेरणी करून समाजमनावर त्याचा मारा केला जातो आहे, त्यामुळे तेच सत्य आहे अशी परिस्थिती अलिककडच्या काळात निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. गांधीजींच्या हत्येनंतर झालेल्या तपासातील सगळ्या तपशीलांमध्येही छेडछाड केली जाते आहे. त्यातूनच गांधीजींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात असत्य प्रचलित करण्याचा डाव म्हणून एक याचिका दाखल करण्याचा खटाटोप सुरु असल्याचेही तुषार गांधी यांनी म्हटले आहे.