विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ – राहुल गांधी

rahul-gandhi

नवी दिल्ली- सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे , असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले . संयुक्त जनता दलाचे नेते खा. शरद यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते . या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी , राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद आदी उपस्थित होते . राहुल गांधी म्हणाले की , निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदी यांना यश आलेले नाही. तरीही सरकारच्या कामगिरीच्या नावावर खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. अशा सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही . पंतप्रधान मोदी यांना स्वच्छ भारत हवा आहे .मात्र आम्हाला ‘सच भारत’ हवा आहे , अशी कोपरखळीही त्यांनी मारली . मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून मेक इन इंडिया सुरु केली. मात्र ही योजना सपशेल फसली . देशात सर्वत्र चीन मध्ये बनवल्या गेलेल्या वस्तूच दिसून येतील असे ते म्हणाले . गुलाम नबी आझाद यांनी शरद यादव यांची प्रशंसा केली . नितीशकुमार भारतीय जनता पक्षाच्या साथीत गेले , मात्र शरद यादव यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावयास हवे . , असे ते म्हणाले .