राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर घाबरू नका, आमच्याकडे या; आठवलेंची उदयनराजेंना ऑफर

udayan raje vr ramdas aathavale

सातारा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी ऑफर दिली आहे. उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाही. तर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. असे आठवले म्हणाले. तसेच त्यांनी उदयनराजेंना आरपीआय पक्षात येण्याचे आवाहन केले. ते सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवार बदलला जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. तसेच सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बंददार चर्चा झाली. तेव्हापासून या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. काहींच्या मते ही भेट म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार बदलाची चाचपणी आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी उदयनराजेंना ‘लोकसभा २०१९’ मध्ये तिकीट देण्याचे वक्तव्य केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे आहेत. त्यांना माननारा वर्ग मोठा आहे. ते आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे. आरपीआय या पक्षामध्ये सर्वांना सामावून घेतलं जातं. केवळ दलितांचाच हा पक्ष आहे, असे नव्हे. राष्ट्रवादीने आगीमी निवडणुकीमध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं नाही तर आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना तिकीट दिलं जाईल. तसेच लोकसभेला माझी आणि उदयनराजेंची या दोन जागा निवडून आल्या तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल. उदयनराजे ज्यावेळी मला भेटले तेंव्हा मी त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, असे, आठवले म्हणाले.