शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकार दखल घेत नसेल तर हे दुर्देव, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

Pankaja Munde

बीड : लातूर जिल्ह्यात गेल्या ७२ तासांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप राज्य सरकारने घेतलेली नाही. यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्ला केलाय. शेतकऱ्यांची दखल घेण्यास राज्य सरकारला वेळ नसेल तर हे दुर्देव असल्याचे त्या म्हणाल्या.

माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात ७२ शेतकरी ७२ तासांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यात काही शेतकऱ्यांची प्रकृती देखील खराब झाली आहे. तरी देखील या शेतकऱ्यांची दखल राज्य सरकारने घेतलेली नाही. यावरुन पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे देखील मुंडे म्हणाल्या. सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही या बद्दल मी तीव्र नापसंती आणि दुख: व्यक्त करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. एक आमदार माजी मंत्री सरकारचे लक्ष सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी प्रयत्न करतोय. तरी देखील या प्रश्नाचा निपटारा होत नसेल तर हे दुर्देवी असल्याचेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या