अभाविपचं विधीच्या मागण्यांसाठी विद्यापीठात मूक आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पुणे : – विधीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सतत पाठपुरावा करून देखील विद्यापीठ प्रशासन शांत असल्याने विधीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर शाखेने पुणे विद्यापीठात मूक आंदोलन केले. ह्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून विद्यापीठाचा निषेध केला.

परीक्षेच्या दोन पेपर मध्ये किमान एक दिवस सुट्टी असावी, परीक्षेच्या वेळेस उत्तरपत्रिकेसोबत दोन पानांऐवजी सोळा पानी पुरवणी असावी, परीक्षेच्या नंतर विद्यार्थ्यांना ‘स्कीम ऑफ मार्किंग’ कळवण्यात यावे, प्रत्येक पेपरमध्ये 45 मार्क उत्तीर्ण होण्यासाठी असावे, ऍग्रीगेट पद्धत नसावी, पुनर्मूल्यांकनानंतर एक मार्क वाढला तरी देण्यात यावा, विधीचे पेपर मराठीत देता यावेत अशा मागण्यांचे निवेदन परीक्षा नियंत्रकांना देण्यात आले. या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल अस अभाविप कडून सांगण्यात आलं.