‘चौकशीसाठी कोर्ट आर्यनला जामीन देत नसेल तर तडफडण्याचे कारण काय?’ चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

‘चौकशीसाठी कोर्ट आर्यनला जामीन देत नसेल तर तडफडण्याचे कारण काय?’ चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

पुणे : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (एनसीबी) तीन ऑक्टोबरला अटक केली होती. जवळपास तीन आठवड्यांनंतरही हे प्रकरणं चर्चेत आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री सातत्याने एनसीबीवर आरोप करत आहेत.

यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. ‘महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही मात्र शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका. यांचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळेमुळे काढण्यासाठी उच्च न्यायालय जामीन देत नसेल, तर एवढे तडफडण्याचं काम नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना आर्यन खान प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ‘मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही.

शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही असेही चंद्रकात पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या