‘पेरणीपूर्वी कापूस विकला गेला नाही तर शेतक-याला सावकाराच्या दारात जाण्याची गरज पडू शकते’

Uddhav Thackeray

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाचा च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीव्यवस्था आणि शेतकरी उध्वस्त होऊ नये यासाठी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँक यांच्या माध्यमातून शेतक-यांना तात्काळ कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे या मागणीसाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

लोणीकर या पत्रात म्हणतात,मागील पंचवार्षिक मध्ये जिल्हाभरात कर्ज वाटपाबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या, त्या बैठकांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर, लीड बँकेचे चेअरमन – मॅनेजर, कृषी व{भाग, महसूल विभाग इत्यादी च्या माध्यमातून लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले.परंतु या वर्षी मात्र बँक कर्ज वाटप बाबत टाळाटाळ करत आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांनी बैठक घेऊन बँकांना ताकीद देणे आवश्यक आहे तसेच मुजोरी करणा-या बँकेवर कारवाई करून त्या बँकेचा परवाना रद्द करण्याबाबतची शिफारस जिल्हाधिकारी यांनी रीझर्व बँकेकडे करणे आवश्यक आहे.

लोणीकर म्हणतात, कर्ज वाटपाच्या बाबतीत मागील काही वर्षात जालना राज्यात सातव्या तर मराठवाड्यात दुस-या क्रमांकावर होता. या वर्षी मात्र कर्ज वाटपाचा लक्षांक मागील काही वर्षांपेक्षा कमी असताना देखील बँकांच्या मुजोरी मुळे लक्षांक पूर्ण होईल असे वाटत नाही. कर्ज पुरवठा झाला नाही तर शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल. एक तर संपूर्ण तालुकाभरात सीसीआय कापूस खरेदी केंद्र एक असते, त्यात ३० ते ४० लोकांचा कापूस दररोज घेतला जातो परंतु नोंदणी मात्र तीन हजार ते पाच हजार शेतक-यांनी केलेली आहे.

त्यामुळे पेरणीपूर्वी कापूस विकला गेला नाही तर शेतक-याला सावकाराच्या दारात जाण्याची गरज पडू शकते, परीणामी शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांनी वेळीच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी , तसेच तहसीलदार आणि सर्व बँकेचे मॅनेजर यांना वेळीच आदेशीत करून शेतक-यांना कर्ज वाटप करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना द्याव्यात अशी विनंती लोणीकर यांनी केली आहे.

मेगाभारतीने भाजपची संस्कृती बिघडली; चंद्रकांत पाटलांचा भाजपला घरचा आहेर

‘पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू देऊ नका’

कोरोनाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या आपत्ती निवारण प्रक्रियेच्या नियमावलीत सुधारणा