संविधान वाचवायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज – अशोक चव्हाण

मुंबई : भाजपकडून सातत्याने संविधानात बदल करण्याची खेळी सुरु असून, देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधल्याशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात चव्हाण बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व जणांनी एकवटले पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील शासन आणि अनेक सत्तांतरे पाहिली. मात्र २०१४ सालानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीइतकी वाईट परिस्थिती याआधी कधीही पाहिली नाही. त्यामुळे लोकशाहीचे पुरस्कर्ते एकत्र आले नाही, तर २०१९ सालानंतर निवडणुका होतील का? अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.