केंद्र सरकारने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची घोषणा

kejariwal

नवी दिल्ली : सिरममध्ये बनवण्यात येत असलेल्या कोविशिल्ड लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. काल लसींची वाहतूक करणारे ट्रक पोलिस बंदोबस्तात लोहगाव विमानतळावर रवाना झाले. तिथून हवाईमार्गे या लसींचं वितरण देशभरात सुरू झालं आहे.

एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे साडे छप्पन लाख डोस पुण्यातून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंडीगड या शहरात पोहोचवले जाणार आहेत.

एका बाजूला या लसीमुळे देशभरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे अपील केले आहे की, देशभरातील लोकांना कोरोनाची लस मोफत देण्यात यावी. दिल्लीचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी सांगितले की, जर केंद्र सरकार इथल्या लोकांना मोफत लस देणार नसेल तर दिल्ली सरकार आपल्या खर्चाने दिल्लीतील जनतेला मोफत लस देणार आहे.

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. पण केंद्राकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भारत देशात गरीबीचं प्रमाण अधिक आहे आणि गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लशीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या