मुंबई: बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने रविवारी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान याच पार्श्वभूमीवरून शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा संतप्त सवाल आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कर्नाटकची ही पहिलीच घटना नाही. बंगळुरूत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्या घटनेचे पडसाद उमटले. कर्नाटकातील शिवरायांच्या विटंबनेची घटना ही छोटी घटना असल्याचे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला. शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
शिवाजी नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या असे एकदा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. अशा शिवाजी महाराजांची विटंबना भाजपाशासित राज्यात होते व मुख्यमंत्री बोम्मई यांना ती किरकोळ घटना वाटते हा सुद्धा महाराजांचा अपमानच आहे. पुतळय़ांची विटंबना करून राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, त्यातून वातावरण खराब करणे ही एक विकृती समाजात वाढत चालली आहे. छत्रपती शिवरायांच्या विटंबनेचे वृत्त ताजे असतानाच त्याच रात्री बंगळुरूत क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळय़ाचीही विटंबना झाल्याचे समोर आले आहे. राणी चेन्नम्माच्या पुतळय़ाची विटंबना होण्याचे प्रकार घडले आहेत व मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात त्याप्रमाणे या किरकोळ घटना नक्कीच नाहीत. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करण्याच्या घटना वारंवार घडतात व दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. असा विरोधाभासही संजय राऊत यांनी केला आहे.
बोम्मई यांनी हे तरी समजून घेतले पाहिजे. बेळगावसह सीमा भागात ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा द्यायला भाजपा सरकारने बंदी घातली आहे. बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा झेंडा जबरदस्तीने खाली उतरवला आहे. मनगुत्ती येथील शिवरायांचा पुतळा रातोरात जेसीबी लावून हटवला. हे सर्व कृत्य करताना दिल्लीतील भाजपा पुढाऱ्यांना शिवरायांचे शौर्य आठवू नये याचे आश्चर्य वाटते. २०१४ साली मोदी महाराष्ट्रात मते मागायला आले तेव्हा शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींना आहेत अशा आशयाची पोस्टर्स व मोठे फलक सर्वत्र लागले होते. लोकांनी त्यांना त्यामुळे मतदानही केले, पण नंतर शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे कुठे पानिपत झाले ते समजलेच नाही.असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुलाबरावांच्या आव्हानाला नाथाभाऊंनी दाखवला आरसा, म्हणाले…
- आता बिले मिळणार ऑनलाईन घरपोच; औरंगाबाद पालिकेत चकरा मारण्याची गरज नाही..!
- “गुलाबरावांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- द्रविड गुरुजींनी घेतली कर्णधार विराट कोहलीची शाळा : पहा व्हिडीओ