चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो ; कोर्टाने विखेंना फटकारले

sujay vikhe

अहमदनगर : भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले होते. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली होती.

राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा असताना सुजय विखे यांनी गुपचूप केलेल्या प्रकारामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर खंडपीठाच्या न्यायाधीशांना परखड मत व्यक्त करत सुजय विखेंना फटकारून काढले आहे. एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर ताशेरे ओढले.

यावेळी सुजय विखे-पाटील यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव सुजय-विखेंच्या वकिलांनी केला.

तर, ‘तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता,’ असे न्यायमूर्ती घुगे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या