‘ठरवले असते तर या निवडणुका सहज पुढे ढकलता आल्या असत्या, पण सरकारने विश्वासघात केलाच!’

Chandrashekhar Bawankule

नागपूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्व पक्षीय बैठकीमध्ये राज्य सरकारने आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने अपेक्षेप्रमाणे राज्यातील ५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

या संदर्भात ते म्हणाले की, ‘ओबीसी आरक्षणाशिवाय अखेर ५ जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झाल्याने राज्य सरकारने ओबीसी समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. सरकारने ठरवले असते तर या निवडणुका सहज पुढे ढकलता आल्या असत्या. पण सरकारने विश्वासघात केलाच! आम्ही मात्र या सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची आधीच घोषणा केली आहे. कमी-अधिक यशाची पर्वा न करता भाजपा केवळ आणि केवळ ओबीसींनाच उमेदवारी देईल, हे मा. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे.’

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यात आता निवडणुका जाहिर झाल्याने ओबीसी समाजात नाराजी वाढेल. त्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी ओबीसी समाजातील उमेदवार देणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या