भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते; लांडेंची जीभ घसरली ?

पिंपरी: “भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते. जे मला मान्य नव्हते” अशी टीका भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे. पीसीबी टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ते भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

विलास लांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधुन भोसरीत शुक्रवारी (दि. १) गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर हनुमंत भोसले, रंगनाथ फुगे, योगेश बहल, मोहिनी लांडे, वसंत लोंढे आदी उपस्थित होते.

लांडे यांच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजी व्यक्त होत आहे. तसेच यांच्याविरोधात सोशल मिडीयावर मोहीम सुरू केली असून त्यामुळे लांडे यांचे झुकलेले राजकीय पर्व आणखी झुकण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान, विलास लांडे यांच्याशी संपर्क केला असता. मी असे म्हटलेच नाही. कारण माझ्या देवघरात शरद पवारांचा फोटो आहे. त्यांची मी पूजा करतो.  त्यांना सोडून मी दानवेना कुठे गळ्यात घालू.  मी “जाणवे” नाही तर “दानवे” म्हटलो होतो. मला ब्राह्मण समाजाविषयी आदर आहे. माझ्या वक्तव्याचे राजकारण केले जात आहे. असे ते म्हणाले

कोण आहेत विलास लांडे ?

राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. एकदा अपक्ष, तर एकदा राष्ट्रवादीचे आमदार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांचा दारूण पराभव केला. या निवडणुकीत लांडे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.