fbpx

‘मोदींच्या जागी मी असतो तर…’

dhanjay mundhe

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचाराचा धडाका लावला असून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सैनिकांच्या बलिदानाचे राजकीय भांडवल करू पाहणाऱ्या पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहात. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचार सभेत धनंजय मुंडे आज पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अनेक कारगील युद्ध झाले. परंतु, त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मतं मागितले नाही. मात्र स्वतःला चौकीदार म्हणून घेणाऱ्या मोदींना शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ आली आहे. त्यामुळे मोदीजी मी तुमच्या जागी असतो, तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते. असे मुंडे यावेळी म्हणाले.

पुढे मुंडे म्हणाले की, उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी मोदींनी बोलणे जनतेला अपेक्षीत होते. परंतु, मोदींवर शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ आली असल्याचे मुंडे म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीच्या इतर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे मतदान झाले असल्याने आता प्रत्येक राष्ट्रवादीचे नेते मावळमध्ये दाखल झाले आहेत. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी हे सारे नेते मावळ मध्ये ठिय्या मारून बसले आहेत. मावळ मध्ये यावेळेस चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. कारण आघाडीकडून पार्थ पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप युतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढचे २ दिवस मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पार्थ यांच्याबरोबर दिसणार आहेत.