fbpx

मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेलं : शरद पवार

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा – ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने विरोधकांचे कान उपटले असताना विरोधकांकडून मात्र जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पुन्हा एकदा धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.

ईव्हीएम मशीनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान,लोकसभा निवडणुकीत मतांचं व्हीव्हीपॅटसोबत पडताळणीची मागणी करणाऱ्या २१ विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत त्यांची याचिका फेटाळली आहे.एकाच प्रकरणात कोर्टानं किती वेळा सुनावणी करायची? असं म्हणत कोर्टानं विरोधकांना चांगलंच झापलं आहे.

पुढे बोलताना पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले, सगळ्याच मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही मात्र मी हे पाहिलेलं आहे म्हणून मी काळजी व्यक्त केली असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी EVM घोटाळ्यावर माझा विश्वास नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर बारामतीत घोटाळा करून दाखवा, असं थेट आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत असताना पवार यांनी हे आव्हान दिले होते.