देश हितासाठी मला प्राण पण द्यावे लागले तर ते माझे सौभाग्य- अण्णा हजारे

anna hajare

नवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढची रणनिती ठरवण्यात येईल.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यास जाणार आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांनी एक भावूक संदेश दिला आहे.

अण्णा हजारे म्हणतात, ”आज उपोषणाचा ७ वा दिवस आहे. मी खूप थकलो आहे. डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. या परीस्थित मला सर्व कार्यकर्ते, माझ्या गावातील ग्रामस्थ, तसेच देशातील लाखो नागरिक उपोषण सोडण्यास सांगत आहेत. मात्र शहिदांना आठवून माझ मनोबाल वाढलं आहे. मी शहीद दिनाच्या दिवशी उपोषण सुरु केले होते. त्यामुळे तेव्हाच ठरवलं होत. शेवटपर्यंत लढत राहील. मी ज्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्या सर्व देशवासीयांच्या हितासाठी आहेत. यामध्ये माझे कुठलेही स्वहित नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहती. तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील. जर देशहितासाठी मला प्राण पण द्यावे लागले तर ते मी माझे सौभाग्य समजेल”.

अण्णा हजारे यांच्या भावूक संदेशामुळे कार्याकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत, मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही.

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पारनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. सुपा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जवळे, पानोली, नगर-कल्याण रोडवर टाकळी-ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.