‘जर मला ओबीसी समाजाला आरक्षण देता येत नसेल तर पदावर राहण्यात काय उपयोग ?’

obc

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

संपूर्ण राज्यभरात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. अशातच, राज्य मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्याने तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदावर राहण्यात उपयोग काय?’ असा उद्विग्न सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपुरातील मानेवाडा चौकात आंदोलन करत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता केलेल्या या आंदोलनामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या