‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा

dhoni

अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आणि धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यांची मैत्री जगजाहीर आहे. धोनी आणि रैना जवळपास 14 वर्षे टीम इंडियामध्ये एकत्र होते. त्याच वेळी, दोघेही एक दशकाहून अधिक काळ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये CSK साठी खेळत आहेत. धोनी सीएसकेचा कर्णधार आहे तर रैना अनेक वर्षांपासून उपकर्णधार आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रैनाने सीएसकेला अनेक सामन्यांतही हाताळले आहे.

त्यामुळे आता असा अंदाज लावला जाऊ शकतो की, जेव्हा धोनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, तेव्हा रैनाने त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदाही म्हटले होते. एवढेच नाही तर रैना आयपीएलमधून निवृत्त होण्याच्या निर्णयावरही धोनीचे अनुसरण करेल. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी त्याने आपली आयपीएल निवृत्ती योजना जाहीर केली होती.

रैनाने जुलैमध्ये एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले होते की, ‘माझ्याकडे चार-पाच वर्षे शिल्लक आहेत. आम्ही या वर्षी आयपीएल खेळत आहोत आणि नंतर पुढच्या वर्षी आणखी दोन संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पण मला वाटते की जोपर्यंत मी स्पर्धेत खेळत आहे तोपर्यंत मी फक्त CSK कडून खेळणार आहे. मला आशा आहे की आम्ही या वर्षी चांगली कामगिरी करू. रैना पुढे म्हणाला होता, ‘जर धोनी भाई पुढील हंगामात खेळत नसेल, तर मीही खेळणार नाही. आम्ही 2008 पासून (CSK साठी) खेळत आहोत. जर आम्ही या वर्षी जिंकलो, तर मी त्याला पुढील वर्षीही खेळण्यासाठी पटवून देईन. मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जर तो खेळला नाही तर मला वाटत नाही की मी कोणत्याही आयपीएल संघासाठी खेळू.

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सीएसके 15 ऑक्टोबरला जेतेपदाचा सामना खेळेल. मात्र, धोनीच्या आयपीएलच्या भविष्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. सीएसकेच्या कर्णधाराने अलीकडेच आयपीएल खेळणे सुरू ठेवण्याचे संकेत दिले होते पण गेल्या आठवड्यात धोनीला याबद्दल आत्मविश्वास वाटत नव्हता.

महत्वाच्या बातम्या