‘दरेकरांनी माफी मागितली नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दरेकरांचे गाल लाल करतील’

pravin darekar vs ncp

अकोला : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर वाद निर्माण झाला. काल शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आाणि सांस्कृतिक विभागाने दरेकरांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. दरेकरांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चाचपणी सुरू केली आहे. यासोबतच, पोलीस तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

ऐन गौरी-गणपती उत्सवात दरेकरांनी केलेलं हे वक्तव्य कलाक्षेत्रातील महिलांसह तमाम मातृशक्तीचा अपमान करणारे असल्याचं राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. यासोबतच, ‘अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक चित्रपट कलाकार प्रवेश करीत आहेत. निव्वळ ‘चमकोगिरी’ करीत ‘अच्छे दिन’च्या भुलभुलैय्यात हे कलाकार फसत नसल्यानेच भाजपचा जळफळाट होत आहे.’ असा टोला देखील त्यांनी लगावलाय.

पुढे ते म्हणाले, ‘प्रवीण दरेकरांनी आपल्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मातृशक्तीसह कलाक्षेत्रातील सर्व महिला आणि सुरेखा पुणेकर यांची नाक घासून माफी मागावी. दरेकरांनी माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दरेकरांचे गाल लाल करतील,’ असा इशारा देखील बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या