मदत करा, पण दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार : तुकाराम मुंढे

tukaram mundhe

नागपूर : लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक अशा गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. मात्र मदत पुरविताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन च्या काळात रस्त्यांवर असणाऱ्या लोकांनाही अन्न पुरविले जात आहे. मात्र हे करताना काही ठिकाणी मदत घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत. यामुळे कोरोनाचे समूह संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे करण्याने लॉकडाऊनच्या उद्देशालाच हरताळ फसला जात आहे. समाजकार्य करायलाच हवे. मात्र, कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसे न झाल्यास आणि दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कॉटन मार्केट बंद करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. त्यामुळे कॉटन मार्केटमध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीस अडचण निर्माण होत होती. यावर ठिकाणी घरोघरी जाऊन भाजी विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी सुरक्षेची काळजी घेत भाजीपाला विक्री करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

तसेच सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, गर्दी होऊ नये म्हणून मार्किंग करावी, मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा, आरटीओ नियमाप्रमाणे वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी, वाहन चालकास खोकला, ताप, सर्दी आदी जाणवल्यास त्याने तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.