fbpx

बारामती मतदारसंघातून भाजप जिंकले तर राजकारणातून निवृत्ती घेईन : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेसाठी आज देशभरात तिसऱ्या टप्यातील मतदान चालू आहे. या टप्यात राज्यातील लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बारामती मतदार संघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेच विजयी होणार आहेत असा ठाम विश्वास यांनी व्यक्त केला. जर बारामती मतदारसंघातून भाजप जिंकले तर राजकारणातून निवृत्ती घेईन आणि जर भाजपा हरली तर भाजपाने राजकारण सोडून द्यावं असे आव्हानात्मक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. पवार पुढे म्हणाले की, मी आमदारकीसाठी उभा राहिलो, त्यावेळी मोदींनी बारामतीत सभा घेतली, जवळ-जवळ पाऊणलाख लोकं त्यांच्या सभेला हजर होती. तरीही, मी १ लाख मतांनी निवडून आलो, असेही अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल हे दोन उमेदवार आमने सामने आहेत. दोन्ही उमेदवारांच्या पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे मतदार राजा आता कोणाला लोकसभेत पाठवणार हे पहाण औत्सुक्याच ठरणार आहे.