भाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये शक्तिप्रदर्शन केले होते. मोदी विरोधी चेहरे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी ममतांनी भरवलेल्या सभेला उपस्थिती लावली होती. मात्र यामध्ये शॉटगन म्हणून ओळखले जाणारे भाजप खा. शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे चर्चेचा विषय बनले होते.

मूळ भाजप खासदार असणारे सिन्हा केवळ सभेला उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्याच सरकार विरोधात हल्लाबोल देखील केला आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाने याची दखल घेतली असून लवकरच सिन्हा यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. अश्यातच जर पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आपण भाजपमधून बाहेर पडू, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

शत्रुघ्न यांनी सुशील मोदी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. सुशील मोदींना मी ओळखत नाही .  भाजपमध्ये मी फक्त एकाच मोदींना ओळखतो. खरे ऍक्शन हिरो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. बाकी कोणत्याही मोदींना मी ओळखत नाही. मी काय करावे हे सांगण्याचे त्यांचे काम नाही. जर त्यांना प्रसिद्धीच हवी असेल, तर त्यांनी इतर मार्गांनी मिळवावी. माझे नाव वापरून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करू नये. जर प्रश्न फक्त भाजप सोडण्याचाच असेल, तर पक्षश्रेष्ठींनी मला तसा आदेश द्यावा, मी त्यावर निर्णय घेईन, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.