fbpx

माढ्यातून भाजपने संधी दिली तर नक्की लढू : विजयसिंह मोहिते पाटील

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेने कडून राज्यातील बहुतेक ठिकांंणच्या उमेदवारीचे वाटप झाले असले तरी माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपकडून आज माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी याच पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप कडून तिकीट मिळाल्यास उभारण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, रणजीतसिंह भाजपमध्ये आधीच पुढे गेले आहेत त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवारीची आॅफर दिली तर उभारण्यास तयार आहे. मोहिते पाटलांच्या या नव्या भूमिकेमुळे माढ्याच्या राजकीय वर्तुळात समीकरण बदलताना दिसत आहेत.

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना आघाडी कडून उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती.

दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांना जर भाजपकडून तिकीट देण्यात आले तर मोहिते पाटलांचा सामना आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या बरोबर होणार आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठे विरुद्ध अस्तित्वाची अशी होण्याची शक्यता आहे. परंतु आतापर्यंत माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं भाजप नेत्यांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळे माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असं म्हटलं जात होतं. आता पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आल्याने, उमेदवारीसाठी त्यांचीच चर्चा आहे.