fbpx

ना आडवाणी ना भागवत पक्षात नरेंद्र मोदींना ऐकावं लागतं फक्त ‘या’ नेत्याचे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एककल्ली कारभार चालत असल्याची टीका त्यांच्यावर वारंवार होत असते. ते पक्षात कोणाचेच ऐकत नाहीत अशीही टीका त्यांच्यावर होत होत असते. मात्र , आता खुद्द नरेंद्र मोदींनीच आपल्या पक्षात कोणाच ऐकाव लागत असल्याचा खुलासा केला आहे. “तुम्ही सगळे मला पंतप्रधान म्हणून ओळखत आहात. पण पक्षामध्ये मला कोणाचे ऐकून घ्यावे लागत असेल, तर ताईंचे (सुमित्रा महाजन)”, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. खूप कमी लोकांना हे माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले. इंदौरमधील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी सुमित्रा महाजन यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून सुमित्रा महाजन यांनी त्यांचे काम अत्यंत कुशलतेने केले आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच त्यांनी अनेक लोकांवर आपली छाप पाडली आहे. तुम्ही सगळे मला पंतप्रधान म्हणून ओळखता. पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की पक्षामध्ये मला जर कोणाचे ऐकून घ्यावे लागत असेल, तर ते ताईंचे.

ताई आणि मी आम्ही दोघांनी भाजपमध्ये एकत्रितपणे काम केले. समर्पित वृत्तीने आपले काम करण्याचे जे कौशल्य ताईंमध्ये आहे. त्यामुळे त्यांची या शहराच्या विकासाबद्दलची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.