भेंडी पिकावरील किडींची ओळख आणि माहिती

टीम महाराष्ट्र देशा : तुडतुडे ही भेंडीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळे असून पंखावर काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस वाढून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात.

भेंडी पिकात प्रामुख्याने शेंडे व फळे पोखरणारी अळी या किडीमुळे कोवळ्या शेंड्याचे तसेच फळांचे नुकसान होते. या किडीची मादी निळसर रंगाची अंडी कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर, फळांवर घालते. अळी तपकिरी पांढरट ठिपक्यांची असते. कोवळे शेंडे, फळे यांमध्ये छिद्र पाडून प्रादुर्भाव करते. सुरवातीच्या अवस्थेपासून ही कीड भेंडी पिकात नुकसान करत असते. या किडीची कोषावस्था होडीसारख्या कापडी पिशवीच्या आकारात फळावर, पानांखालीच पूर्ण होते. पतंगांचे पंख हिरव्या रंगाचे असतात. त्यावर पांढरे पट्टे असतात.

तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) ही अळी पाने व फळे खाते. बहुपीकभक्षी वर्गातील कीड असल्यामुळे वर्षभर या किडीचा प्रादुर्भाव शेतात दिसून येतो. त्यामुळे नुकसान जास्त होते. या किडीची मादी पानाच्या पाठीमागे पुंजक्यात अंडी घालते. अळ्या अतिशय खादाड असतात. अळी मोठ्या झाल्यावर फळ कुरतडून खाते. या किडीची कोषावस्था जमिनीत पूर्ण होते.

मादी कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर, भेंडीच्या कोवळ्या फळांवर पिवळसर पांढरी अंडी एक-एकटी घालते. अंड्यांतून अळ्या बाहेर पडल्यानंतर कोवळ्या भेंडीमध्ये शिरून आतला भाग खातात. अळ्यांनी कोवळ्या फळास नुकसान केल्यास फळाचा आकार वाकडा होतो. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते.

महत्वाच्या बातम्या