क्रेडाईचे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल

cridai

नाशिक- कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी ते पालकमंत्री  भुजबळ बोलत होते.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक विलास शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड, निमाचे शशिकांत जाधव, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जीतुभाई ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, अतुल शिंदे, हंसराज देशमुख, अंजन भालोडिया, नरेंद्र कुलकर्णी, हितेश पोतदार, डॉ.कैलास कमोद आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोविडची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनविल आहे. कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्स साठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे.

रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे.कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, घाबरून जाऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध
करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करतआहेत, समाजिक दायित्व म्हणून हे काम सदैव कायम ठेवाण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रेडाईने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्वाच आहे. क्रेडाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर हे अतिशय सोयीं सुविधा युक्त असून रुग्णांना याठिकाणी आल्यानंतर चांगले उपचार मिळतील. नाशिक शहरातुन कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रित काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 1200 पथके काम करत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार पुणे मुंबईच्या धर्तीवर ठक्कर डोम येथे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी उपचारासोबत रिक्रियेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जाणार असून याठिकाणी अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

क्रेडाई चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, कोविडची महामारी जेव्हापासून ओढवली गेली तेव्हापासून मदतीचा हात पुढे केला होता. कोविडच्या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात आवश्यक ती मदत करण्यास क्रेडाईने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईला कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक भान ठेवून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेला हे सेंटर आहे.

यात 350 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 5 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तसेच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

विजयदुर्ग: खासदार संभाजीराजेंनी केली किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी