…त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत

corona

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक संशयित कोरोनाचे बळी पडल्याचे अहवाल समोर येत आहेत. त्यामुळे देशात चिंताजनक परिस्थिती आहे. अशातच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलासा देणारी माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १,३९७ रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, अमेरिकेचा विचार करता अजूनही भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा अत्यंत कमी आहे, असे मत ICMRच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की,  अमेरिका आणि भारतामधील परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे संसर्गाचा धोका फारच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ ज्याठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा जास्त धोका असेल तिथेच मास्क वापरणे गरजेचे आहे.

दरम्यान आतापर्यंत देशभरात ४२,७८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी खासगी लॅबची मदत घेतली जात आहे. तसेच कोरोनाचा एक रुग्ण आढळलेला परिसरही सील केला जात आहे. भारतात लॉकडाऊननंतर कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावला आहे. तर अमेरिकेत याचं कोरोनाने आतापर्यंत ३१७० जणांचा बळी घेतला आहे.