‘पनामा’नंतर पॅराडाईज पेपर

black money

टीम महाराष्ट्र देशा- पॅराडाईज पेपर्समधून करचोरी आणि काळ्या पैशांचे पांढऱ्यामध्ये होणारे रुपांतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. यामुळे भारतासह जगभरात एकच खळबळ माजली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडामधील अनेक बड्या नावांचा समावेश ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये आहे. श्रीमंत व्यक्ती आणि कंपन्या यांच्याकडून होणारी करचोरी, तो पैसा परदेशात पाठवण्याची पद्धत आणि हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरले जाणारे मार्ग याचा उलगडा यामधून झाला आहे.या पेपर्समध्ये महाराणी एलिजाबेथ द्वितीय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही मंत्र्यांसह जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आहेत. भारतातील 714 व्यक्तींची नावं यामध्ये आहेत. या सर्वांनी परदेशातील कंपन्या आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा लपवला असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे .

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील 96 नामांकित माध्यमसमुहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा केला. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींची नावं यातून समोर आली आहेत.

पत्रकारांना या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. 119 वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचं मोठं नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या 714 एवढी असून भारत जगात 19 व्या क्रमांकावर आहे.अहवालात ज्या 180 देशांचा डेटा देण्यात आला आहे, त्यामध्ये भारत 19 व्या स्थानावर आहे. मोदी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या दोन दिवस अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस सरकारकडून काळेधन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

या भारतीयांच्या नावाचा आहे समावेश
नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.