भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरणाऱ्या पुण्यातील दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांची बदली

पुणे: पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा दबंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असणारे तुकाराम मुंडे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही आज बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मागील काही काळापासून सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरताना दिसत होते. त्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याच बोलल जात आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात भाजप कुमार म्हणून संबोधले जाणारे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना मात्र कार्यकाळ संपूनही अभय दिल जात आहे.

तुकाराम मुंडे हे पीएमपीएलच्या अध्यक्षपदी रुजू झाले तेंव्हा पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाची असणारी बससेवा कोलमडली होती. मुंडे यांचे धडाकेबाज निर्णय आणि कामाच्या शैलीमुळे काही महिन्यांतच पीएमपीएलची गाडी रस्त्यावर आली. मात्र मुंडे यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे नाराज झाल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सत्ताधारी भाजप नेत्यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या प्रेरणा देशभ्रतार यांनीही पालिकेतील चुकीच्या कामांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी देशभ्रतार यांचे अधिकार कमी करण्याची मागणी केली होती.

काल एकाबाजूला पुण्यातील शिवसृष्टीचा तिढा सोडवण्यात आला आहे, तर दुसरीकडे मुंडे आणि देशभ्रतार यांच्या बदलीची ‘मिटिंग’ देखील झाल्याची माहिती मिळत आहे. तर कार्यकाळ संपलेले पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली कधी होणार हा मात्र प्रश्नच आहे.