fbpx

गडकरींना पाच लाख मतांनी पराभूत करणार, नाना पटोलेंची डरकाळी

टीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येत आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींना सुमारे पाच लाख मतांनी पराभूत करणार, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. “देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथेही लोकांच्या मनात सरकारबाबत नाराजी होती. त्यातही नागपूर शहरात कमी मतदान झाले आहे. जे झाले ते काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या आधी म्हटल्याप्रमाणे मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे.” असा दावा नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एक्झिट पोल म्हणजे केवळ अंदाज असल्याचं म्हटलं आहे. खरी परीस्थिति मतमोजणी नंतरचं स्पष्ट होईल. असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, राज्यात, कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला २४ ते २५ जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.