VIDEO- बांडगुळांना मी घाबरणार नाही- सदाभाऊ खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली. माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानींवर टीका केली आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर गाजरं फेकल्याची घटना समोर आली आहे. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळ ही घटना घडली आहे. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली. पण दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला. पाया खालची वाळू सरखल्याने माझ्या गाडीवर हल्ला केला आहे असं खोत म्हणाले. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला मी घाबरणार नाही. मी हल्ल्याचा धिक्कार करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही

रयत क्रांतीकडून राजू शेट्टींच्या कार्यालयाची तोडफोड; पुतळाही जाळला

एकेकाळी एकाच काठीने सरकारवर हल्ला करणारे खा राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज एकमेकां विरोधात उभे ठाकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणारा हा संघर्ष आज थेट दगडफेक आणि कार्यालय फोडण्यापर्यंत पोहचला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांची गाडी फोडली, तर याचे प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शेट्टी यांचे कार्यालय फोडले आहे. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नेमक काय घडल

सदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.

आता राजू शेट्टींना राज्यात फिरून देणार नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता स्वाभिमानीचे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आला आहे. याचेच पडसाद राज्यभरात दिसून येत असून इस्लामपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले. खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे व झेंड्यांचे दहन करण्यात आले आहे