मी माझी स्थिती एकनाथ खडसेंसारखी होऊ देणार नाही-पंकजा मुंडे

मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. भारतीय जनता पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याने आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप सोडला. यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून महत्वाचे संघटनात्मक पद मिळेल अशी अपेक्षा होती. तसेच विधान परिषदेवर आमदार होऊन थेट मंत्री व्हावे, अशा स्वरुपाचा राजकीय फॉर्म्युला खडसे यांच्या प्रवेशासाठी ठरला होता.

पण राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती न केल्याने त्यांची आमदारकी रखडली आहे. मंत्रिपदाचा तर सध्या विषय पण नाही. त्यातच खडसे यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांचे गिरीश चौधरी हे जावई ईडीच्या कोठडीत आहेत. तर दुसरीकडे खडसे यांच्यावरही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे सीडीची भीती दाखवणाऱ्या खडसे यांच्या राष्ट्रवादीत येऊन अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने पंकजा मुंडे समर्थक नाराज आहेत. पंकजा मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडावा अशी मागणी होतेय. त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्या म्हणाल्या, ‘पक्ष सोडावे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व नेते ओबीसी समाजातील आहेत. मी पक्ष सोडण्याचा विषय कुणी आणला याचा शोध घ्या. मी असे कधीच म्हणाले नाही.ऑफर तर सगळ्या पक्षांकडून होत्या. मंत्रिपदाची ऑफर होती तेव्हा. पण मुंडे साहेबांनी जो पक्ष वाढवला, मला ज्या पक्षाने वाढवलं तो मी सोडून का जाऊ? माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही. अविरत संघर्ष करत राहीन’.

‘या’ कारणामुळे मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही

नेते मानताना देवेंद्र फडणवीस यां नावाचा उल्लेख न केल्यावरही पंकजा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘२०१४ पूर्वी फडणवीस आणि मी राजकीय पटलावर एकत्र काम केल्याने आम्ही सहकारी आहोत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस होते. विधिमंडळाच्या कामकाजात मी त्यांना मानते. पण, राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आहे. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टीका केलेली नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे, असे मी म्हणाले होते’ असा खुलासा त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP