शेतकऱ्यांची कर्जमाफी, पडझड झालेली घरे बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : छत्रपती संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन लोकांना मदतीचं आश्वासन दिले आहे. याविषयी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी ‘कोल्हापूर शहर व आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावांतील पाणी ओसरत असले तरी शिरोळ तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. शिरोळ तालुक्यात मदतकार्य काल करण्यात आले. शिरोळ मध्ये सर्व बोटी व लष्करी तुकड्या रवाना करण्यात आल्या. उद्या विशाखापट्टणम येथून १३ बोटी मागवण्यात आल्या असून त्याही शिरोळला देणार आहे.

सैनिक टाकळी, दत्तवाड, राजापूर येथील पुरपरिस्थिती फारच गंभीर आहे. राजापूरवाडी गावाचा बाहेरच्यांशी संपर्क तुटला आहे. अख्खं गाव एका मंदिरात आहे. या गावात आम्ही पोहोचलो असता त्याही परिस्थितीत सर्व ग्रामस्थांनी आम्हाला चहा करुन दिला. त्यांची छत्रपती घराण्यावर असलेले प्रेम व निष्ठा पाहून मला काम करण्यास दहा हत्तीचे बळ मिळते. दत्त शिरोळ कारखान्यामध्ये अनेक गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले आहे. त्यांना भेटून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पूरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले आहेत, घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या सर्वांना घर बांधून देण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेणार आहे. कोल्हापूर सांगली परिसरातील सर्व पिके नष्ट झालेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे त्यांचे माफ करुन, बिनव्याजी मदत सरकारकडून मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी माहिती दिली आहे.