चाहत्यांचे आभार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ; रणझुंजार जडेजाचा निर्धार

टीम महाराष्ट्र देशा- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा झालेला पराभव चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेला.

जय आणि पराजय हा खेळाचा भाग आहे. आग ओकणाऱ्या किविज गोलंदाजांचा सामना रविंद्र जाडेजाने मोठ्या हिमतीने केला. त्याची ७७ धावांची जिगरबाज खेळी करोडो क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात कायम राहील . रणांगणात झुंजणाऱ्या जडेजाला पाहून चाहत्यांना कित्येक झुंजार योध्य्यांची आठवण आली.

या पराभवानंतर रविंद्र जडेजाने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. जडेजानं आपल्या ट्विटमध्ये, कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानं शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असे त्याने म्हटले आहे.