fbpx

माझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेड या राम शिंदे यांच्या मतदारसंघात कधी अजित पवार तर कधी रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या येत असतात. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांतील व्यक्तींच्या फेऱ्या देखील या मतदारसंघात वाढल्या आहेत. याचाच धागा पकडून राम शिंदे यांनी नुकताच चौंडी येथे दौरा करणाऱ्या रोहित पवारांना चांगलचं फटकारलं आहे.

कर्जत – जामखेड या मतदारसंघात आपण विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. अनेक कल्याणकारी योजना आणून, त्या राबविल्या देखील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील जनता आपल्यावर चांगलीच खुश आहे. सलग दहा वर्षे विकासकामे केली असून, ही कामेच विरोधकांना उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात फेऱ्या  घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो, असे असे राम शिंदे यांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींची उपस्थित होते.

दरम्यान, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे नुकतेच जामखेड तालुक्यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे विचारले असता, पक्षाने जबाबदारी व संधी दिली तर कार्यकर्ता म्हणून मी ती नक्कीच पुढे नेईन, असेही सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. आज मतदारसंघात संवाद साधण्यासाठी आलो आहे. लवकरच चर्चेसाठी येणार आहे. त्यावेळी मोठी सभा घेऊ, असे रोहित पवार यांनी सांगितले होते .