‘पक्षात येण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती’, भाजप आमदार पाटील यांनीच केली पोलखोल

बंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार श्रीमंत पाटील यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने पैशांची ऑफर दिली होती, असे श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

‘मी पैसे न घेता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर मिळाली होती. त्यावेळी मला हवे तेवढे पैसे मिळाले असते. पण मी पैशांची मागणी केली नाही. मी जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाची मागणी केली होती. पण मला मंत्रीपद का दिले गेले नाही हे मला माहित नाही, पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झाल्याचे पाटील यांनी सांगितले. श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कागवड तालुक्यातील ऐनापूर गावात विकासकामांचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

१६ आमदारांनी पाठिंबा काढून घेत पक्ष सोडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. कर्नाटकमध्ये भाजपाचे येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद देण्यात आले होते. परंतु, बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले तेव्हा पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :