एकनाथ खडसेंना पुढच्या मंत्रिमंडळात पहायचं – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आपणचं सत्ता राखणार आहे असा दावा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा देते, खडसे मंत्रिमंडळात असावेत, अशी माझी इच्छाही आहे अस विधान मुंडे यांनी बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

तसेच पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसेंवर अन्याय झाला का असा प्रश्न विचारण्यात आला त्याला उत्तर देताना त्यांनी ‘नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं असं उत्तर देत सावध भूमिका घेतली.

दरम्यान, एकनाथ खडसे हे भाजपची सत्ता येण्यापूर्वी विरोधीपक्षनेते होते. त्यानंतर सत्ता आल्यावर त्यंची मंत्रिमंडळात निवड झाली होती. परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.