मला पुन्हा क्रिकेट खेळायचं आहे; अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

टीम महाराष्ट्र देशा : मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु आता त्याने हा निर्णय मागे घेतला आहे. तसेच त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या पत्रात त्याने ‘चेन्नई सुपर किंग्स, व्ही व्ही लक्ष्मण आणि नोएल डेव्हीड यांचे आभार. त्यांनी या कठीण काळात मला पाठींबा दिला आणि माझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे, याची जाणीव करून दिली. त्यामुळे मी माझा निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे. तो निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं मत व्यक्त केले आहे.

तसेच पुढे त्याने ‘मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे आणि सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. हैदराबाद संघासोबत पुढील मोसमात खेळण्याची इच्छा आहे आणि मी सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी १० सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध आहे अशा शब्दात विनंती करत पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामळे हैदराबाद संघव्यवस्थापन आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अंबाती रायडूने भारतातर्फे ५५ एकदिवसीय तर ६ टी२० सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३ शतकांसह १६९४ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ४७.०६ इतकी होती. त्याने अखेरचा एकदिवसीय सामना मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.