‘मला न्याय हवा..’ चार वर्षीय बालकाची पंतप्रधान मोदींकडे मागणी

justice

आसाम : आपल्या वडिलाच्या हत्येला न्याय मिळावा यासाठी केवळ चार वर्षीय बालकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे देखील या बालकाने वडिलांच्या हत्याप्रकरणाची दखल घेण्यात यावी अशी विनंती केली आहे. या मुलाचे नाव रिझवान साहिद लासकर असून आसामच्या कचर जिल्ह्यातील सिलचर येथे रिझवान राहतो. २६ डिसेंबर २०१६ रोजी रिझवानचे वडील सैदुल अलोम लास्कर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी रिझवान केवळ तीन महिन्यांचा होता.

यासंदर्भात रिझवानने ट्विटरवर स्वतःचा ४५ सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रिझवानाने हातामध्ये एक फलक पकडलेला आहे. ज्यावर ‘मला न्याय हवा आहे’ असे लिहिलेले आहे. व्हिडिओमध्ये त्याने ‘माझं नाव रिझवान साहिद लास्कर आहे. महोदय, मी जेव्हा ३ महिन्यांचा होतो तेव्हा म्हणजेच २६ डिसेंबर २०१६ रोजी माझ्या वडिलांची ११ बदमाशांनी निर्घृण हत्या केली होती. आता मी पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, या प्रकरणाची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा’ असे म्हंटले आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिझवानचे वडील कंत्राटदार होते आणि वाळू माफियांनी त्यांच्या कार्यालयाजवळ त्यांची हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कचर जिल्हा पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी आपल्या पतीच्या हत्येत ११ जणांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी कचर पोलिसांकडून भारतीय दंड संहिते अंतर्गत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या