मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही : दानवे

टीम महाराष्ट्र देशा – मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही कळतो. राफेल आणि आदर्श घोटाळ्यावर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना खुलं आव्हान दिले आहे.

राफेल करार हा खासदार दानवे यांच्या डोक्याबाहेरचा विषय असल्याची टिप्पणी खासदार चव्हाण यांनी नुकतीच केली होती.चव्हाण यांनी केलेली टीका दानवे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे जालन्यात बोलताना दानवे यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेत चांगलीच आगपाखड केली.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे? 

राफेल घोटाळा हा कॉंग्रेसच्या काळात झाला. मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही कळतो. भाजपने राफेल करारात काही महत्वाचे बदल केल्याने कॅांग्रेसचा तिळपापड होत आहे.त्यामुळे कॅांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मला या विषयी अक्कल शिकवू नये. या प्रकरणावर जाहीरपणे चर्चा करायला आपण कोणत्याही क्षणी तयार आहोत.