‘बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’ गंभीर आरोपानंतर परबांच भावनिक स्पष्टीकरण

anil parab

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.

अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर लगेचच अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी दैवत मानतो आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो असं कोणतंही कृत्य मी केलेलं नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांमध्ये घडलेला शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे आरोप ठरवून केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तिसऱ्या मंत्र्यांच नाव बाहेर आणू असं भाकीत करत होते. म्हणजे हे सर्व ठरवून केलं जात आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार असून सचिन वाझे याचे आरोप खोटे आहेत,’ असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं आहे.

नेमके वाझेने अनिल परब यांच्यावर काय आरोप केलेत ?

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. मात्र, हे प्रकरण आपल्या हातात नसल्याचं सांगत असमर्थता दर्शवल्याचं वाझे यांनी नमूद केलं आहे.

यासोबतच, जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावलं आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितलं. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही, असा गौप्यस्फोट सचिन वाझे याने केला आहे.

महत्वाच्या बातम्या